भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये टेक्नो-इनोव्हा-२०२६ स्पर्धेची धमाक्यात सुरुवात

पुणे : “AI ही काळाची गरज असली, तरी त्याचा वापर आवश्यकतेनुसारच करावा. भविष्याचा वेध घेताना, AI साठी वापरल्या जाणाऱ्या डेटा सर्व्हरचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. AI च्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि नावीन्य शोधण्याची वृत्ती कमी होत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ चौकटीत न राहता स्वतंत्रपणे विचार करावा, आत्मविश्वास बाळगावा आणि आपल्या ज्ञानाचा विनियोग समाजहितासाठी करावा. आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही; तर नाविन्यपूर्ण विचार, समस्या विश्लेषणाची दृष्टी आणि प्रभावी सादरीकरण ही कौशल्ये आत्मसात करणे अनिवार्य आहे. ‘टेक्नो-इनोव्हा’ सारखी व्यासपीठे विद्यार्थ्यांना ही कौशल्ये विकसित करण्याची सुवर्णसंधी देतात. १९९९ पासून अखंडपणे सुरू असलेल्या या स्पर्धेने २८ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.” असे प्रतिपादन भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. डॉ. सौ. अस्मिताताई जगताप यांनी ‘टेक्नो-इनोव्हा २०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी केले.

तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागावी या हेतूने संस्थेचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम व भारती मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये “टेक्नो-इनोव्हा-२०२६” या राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. यंदा स्पर्धेचे २८ वे वर्षे आहे. स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. रोटेरिअन मोहन पालेशा, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ व अध्यक्षा म्हणून भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका मा. डॉ. सौ. अस्मिताताई जगताप उपस्थित होत्या. या स्पर्धेमध्ये पाच वेगवेगळ्या विभागांअंतर्गत विद्यार्थी आपले तांत्रिक शोधनिबंध सादर करतात, यंदा १०० पेक्षा जास्त तंत्रनिकेतन मधील ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर ग्रीन क्लब सारख्या कार्यक्रमाअंतर्गत पाणी बचत या विषयावर विद्यार्थ्यांकरिता पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

प्रभारी प्राचार्य श्री. हृषीकेश देशमुख यांनी आपल्या मनोगतात तंत्रनिकेतनच्या आजवरच्या कामगिरीचा अहवाल सादर करतानाच संस्थेची शैक्षणिक परंपरा,, मानांकन प्राप्त अभ्यासक्रम, उद्योगसंलग्न व विद्यार्थीभिमुख उपक्रम, विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीचा उल्लेख करत “टेक्नो‑इनोव्हा‑२०२६” हा उपक्रम हीच परंपरा अधिक बळकट करेल, असा विश्वास व्यक्त केला.

See also  मनोहर भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. - अरविंद शिंदे,अध्यक्ष-पुणेशहर काँग्रेस

“आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान युगात मानवी संवेदनशीलता हरवत चालली आहे, याकडे प्रमुख पाहुणे मा. रोटेरिअन मोहन पालेशा यांनी लक्ष वेधले. समाजात ‘अपेक्षा’ आणि ‘आवश्यकता’ यांच्यातील सीमारेषा अधोरेखित करणे आज गरजेचे झाले आहे; कारण गरजेपेक्षा जास्त मिळवण्याच्या हव्यासामुळे समस्यांचे डोंगर उभे राहत असून नैराश्य वाढत आहे. विद्यार्थ्यांनी आपले संवेदनशील मन जपायला हवे. ध्येयप्राप्तीसाठी समर्पित राहताना, ध्येयापासून विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे. माणुसकीचा ओलावा जपा, नवीन भाषा आणि कौशल्ये आत्मसात करा आणि आपल्यातील नेतृत्वगुण विकसित करा. केवळ तंत्रज्ञ न होता, ‘समाजाभिमुख आणि संवेदनशील अभियंता’ बना, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

“भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, पुणे आयोजित “टेक्नो‑इनोव्हा‑२०२६” या तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन मरे, समृद्धी कदम, औदार्य माने, स्पर्धेचे निमंत्रक प्रा. सौ. संगीता लाड, सह निमंत्रक प्रा. सौ. जागृती कडू व प्रा. श्री. विद्याभूषण उपाध्ये, उपप्राचार्य श्री. अमितराव पाटील, प्रभारी प्राचार्य श्री. ऋषिकेश देशमुख सर्व स्पर्धक,विद्यार्थी विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर सेवक, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेच्या निमंत्रक प्रा. सौ. संगीता लाड यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्रनिकेतनचे विद्यार्थी कु. प्रतीक सगळगिळे व कु. आर्या आंबेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन मरे याने मानले.