विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक व्यवस्थापन आराखडा बैठक संपन्न

पुणे : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर वाहतूक व्यवस्थापन आराखडा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. वाहतूक नियमनासाठी राबविण्यात येणारे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, अतिरिक पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक नियोजन व  नियंत्रणासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म तपशील लक्षात घेऊन पुढील १० वर्षाचे नियोजन करावे. मुख्य रस्त्यांवरील मिसिंग लिंक, बॉटलनेक काढणे, रस्ता रुंदीकरण, फुटपाथ व पायाभूत सुविधांसह संपूर्ण कॉरिडॉरच्या सुधारणा करण्यासाठी प्राथम्याने करावयाच्या येणाऱ्या कामांची यादी पुणे महानगरपालिकेने तयार करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पथारी विक्रेत्यांचे क्षेत्र निश्चित करावेत, कार्यक्षेत्रानुसार काम करणाऱ्या संस्थांची निवड करावी, कामांची यादी तयार करुन कृती आराखडा तयार करावा, असे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.

बैठकीत शहरातील ९० मुख्य चौकांमध्ये रस्ता रुंदीकरण, फेरीवाल्यांना सार्वजनिक सुविधा जागांमध्ये जागा देणे, पथदिवे बसविणे, बिनधनी वाहनांकरिता जागेची उपलब्धता, तंत्रज्ञान आधारित वाहतूक नियोजन, प्रलंबित इ-चलन, वाहतूक सल्लागार नेमणे, वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढविणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

See also  वाहतूक, खड्डे, अतिक्रमण आणि कचरा व्यवस्थापनावर प्रशासनाची धडक बैठक; रस्ते पूर्ववत करण्यासह अनधिकृत पथविक्रेत्यांवर कारवाईचे निर्देश