पुणे : पाणीपुरवठा समस्येबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने २७ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. Bombay High Court च्या आदेशानुसार ही बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीला बाणेर-बालेवाडी परिसरातील सोसायट्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. फेडरेशनतर्फे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निदर्शनास परिसरातील गंभीर पाणीटंचाईचे प्रश्न मांडण्यात आले.
फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, अनेक सोसायट्यांना पुणे महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असून नागरिकांना बोअरवेल आणि टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या दररोज सुमारे २५० ते ३०० टॅंकर पाणी खरेदी करावे लागत असून यासाठी वर्षाकाठी तब्बल १० ते १२ कोटी रुपयांचा खर्च होत आहे.
येत्या काही महिन्यांत बोअरवेल आटण्यास सुरुवात होणार असल्याने टॅंकरवरील अवलंबित्व आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच परिसरात नव्या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे २५ ते ३० हजार नागरिकांची वाढ होणार असून ‘फ्लोटिंग’ लोकसंख्येचा प्रश्नही गंभीर होणार आहे. मात्र, या वाढत्या मागणीसाठी दीर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा (DPR) उपलब्ध नसल्याचे समोर आले.
फेडरेशनने स्पष्ट केले की, या भागाला दररोज ९ एमएलडी पाण्याची गरज असताना केवळ ६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. ही तूट पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली. बैठकीत विभागीय आयुक्तांनी या दोन्ही मुद्द्यांवर पुढील बैठकीत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच वार्ड स्तरावर नागरिकांसोबत पाणी प्रश्नावर नियमित बैठक घेतली जात नसल्याची बाब मोरेश्वर बालवडकर यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून बैठका आयोजित करण्याचे आदेश आयुक्तांनी महापालिकेला दिले.
याशिवाय, कमी पाणीपुरवठा होत असलेल्या सोसायट्यांची यादी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांकडून त्या सोसायट्यांशी थेट संपर्क साधण्यात येणार आहे.
या बैठकीत बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनतर्फे यश चौधरी, आशिष कोटमकर यांनी भूमिका मांडली. तसेच रमेश रोकडे, दफेदार सिंह, शैलेश पाटील आणि ओमप्रकाश वानखेडे हे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीनंतर बाणेर-बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.























