पाषाण–बाणेर लिंक रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सनी निम्हण यांची मागणी

पुणे : पाषाण–बाणेर लिंक रोड येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक व सार्वजनिक व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या गर्दीमुळे संभाव्य वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केली आहे.

निम्हण यांनी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक विभागाकडे सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होणार आहे. त्यामुळे रिक्षा, कॅब आणि खाजगी वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता या मार्गावर सतत ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता आहे.

तसेच, परिसरात अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि झेरॉक्स दुकाने उभारली गेल्यास अतिक्रमण वाढून रस्ते अरुंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यास नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहून वाहतुकीचा वेग मंदावू शकतो, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती लक्षात घेता सुरक्षा आणि शिस्त राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वनियोजन करून वाहतूक नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, नो-पार्किंग झोन आणि ड्रॉप-ऑफ पॉईंट निश्चित करावेत, स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था उभारावी, तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.

महापालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करून समन्वयाने नियोजन केल्यास नागरिकांना सुलभ सेवा मिळेल आणि परिसरात शिस्त राखता येईल, असा विश्वास निम्हण यांनी व्यक्त केला आहे.

See also  गणेशखिंड मॉर्डन महाविद्यालयाने लष्करी रुग्णालयांसाठी केले रक्तदान