औंध-बाणेर: “मिशन निर्मल – माझा प्रभाग, स्वच्छ प्रभाग” या उपक्रमांतर्गत प्रभाग क्र. ९ मधील वाढत्या कचरा समस्येवर उपाययोजना करण्यासाठी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला घनकचरा विभागाचे उपायुक्त श्री. सपकाळ यांच्या उपस्थितीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे, सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी या भागांतील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्या. कचऱ्याचे योग्य संकलन व वर्गीकरण, गावठाण परिसरात साचणाऱ्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट, तसेच दुकानदार, टपरीवाले आणि पथारीवाल्यांना डस्टबीन वापरण्याची सक्ती करण्यावर भर देण्यात आला.
यासोबतच बेशिस्त नागरिकांकडून अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले. स्वच्छता राखण्यासाठी प्रभागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.
घनकचरा उपायुक्त श्री. सपकाळ यांनी प्रभागासाठी नवीन कचरा संकलन गाड्या आणि ढकलगाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कचरा संकलन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला नगरसेवक अमोल भैय्या बालवडकर, नगरसेविका सौ. रोहिणीताई चिमटे, सहआयुक्त विजय नायकल, डी.एस.आय. भोईर, तसेच आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छ संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग ९ मध्ये कचरा समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची तयारी दर्शवली असून, नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर देण्यात येणार आहे.























