पुणे, दि. ७ : सार्वजनिक बांधकाम विभागात २ हजार १०९ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत निवड झालेले राज्यातील नवनियुक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (विद्युत) व इतर संवर्गातील अशा १ हजार ५३० कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र वितरणाच्या कार्यक्रमाचे मंत्रालय, मुंबई येथे व राज्यातील ८ प्रादेशिक विभागात एकाचवेळी आयोजन करण्यात आले.
पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागांतर्गत निवड झालेल्या एकूण १५५ कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर यांच्यासह सा.बा. विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यपद्धतीची माहिती करुन घ्यावी. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. विहीत कालावधीत गुणवत्तापूर्वक कामे करावीत असे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिमा समाजात उंचावण्यासाठी सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी उच्च दर्जाचे काम करावे, असे आवाहन श्री.चव्हाण यांनी यावेळी केले.
श्री. बहिर यांनी सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना खात्याबाबत व खात्याच्या कामकाजाबाबत माहिती देवून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी भरती प्रक्रिया फक्त ३ महिन्यात पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याबद्दल काही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी सा.बां. विभागाबाबत समाधान व्यक्त केले.
घर ताज्या बातम्या सार्वजनिक बांधकाम विभागात नवनियुक्त १ हजार ५३० कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप