पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा रखडलेला दुसरा टप्पा लांबला होता. अलिकडेच राज्यातील मंत्र्यांनी लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या एक ते दोन आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात पुणे जिल्ह्यासाठी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
आगामी काही काळात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती. त्यामुळे भाजपची सत्ता राखण्यासाठी तसेच पुण्यातील मतदारसंघ अजून भक्कम करण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याचा विचार केला जाऊ शकतो.
त्यामुळे पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पार्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ, दौंड मतदार संघाचे आमदार राहुल कुल आणि भोसरी मतदार मतदारसंघाचे महेश लांडगे ही तीन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आली आहे. राहुल कुल यांनी याआधीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहर असा समतोल साधण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळ विस्तारात केला जाऊ शकतो.