बाणेर येथील बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बाणेर : बाणेर गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडुन झालेल्या अपघातामध्ये बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

बाणेर येथे गणराज चौका जवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या बिल्डिंगच्या पहाडाचे काम सुरू असताना या बिल्डिंग वरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. शाळेतून घरी जाणाऱ्या रुद्र केतन राऊत (वय-९) रा. विरभद्र नगर बाणेर, याच्या डोक्यात सगळी पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

चौकामध्ये बांधण्यात येत असलेली ही इमारत मुख्य रस्त्यावर असून देखील अत्यंत कमी फ्रंट मार्जिन वर या इमारतीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडते. तसेच कमी फ्रंट मार्जिन असल्यामुळे भविष्यात देखील या परिसरातील मुख्य रस्त्यावर व चौकामध्ये वाहतूक समस्या तसेच अपघातांचे प्रमाण वाढणार आहे.

मुख्य चौकामध्ये एवढ्या कमी फ्रंट मार्जिन मध्ये बांधकामाला परवानगी कशी देण्यात आली. तसेच बांधकामावर सुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्यात आले नाही. इमारतीच्या बाबतीत अनेक त्रृटी असताना देखील पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत याची सखोल चौकशी करून बांधकाम व्यावसायिकावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत व सदर बांधकामाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी नागरिक करत आहेत. याबाबत चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

See also  औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नागरिकांच्या समस्या संदर्भात बैठक