पुणे महापालिकेच्या प्रकल्पांना वेग; अतिरिक्त आयुक्तांची पाहणी, विलंबावर कडक भूमिका

पुणे, दि. १० (प्रतिनिधी): पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध पायाभूत कामांची आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत सविस्तर आढावा घेतला. या वेळी मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाहणी दौऱ्याची सुरुवात साधू वासवानी पूल येथून करण्यात आली. त्यानंतर आगा खान नदी पूल, शास्त्रीनगर उड्डाणपूल व अंडरपास, विश्रांतवाडी उड्डाणपूल व अंडरपास तसेच बिंदू माधव ठाकरे चौक येथील उड्डाणपूल प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.
या सर्व प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रगती, कामातील अडचणी तसेच पुढील नियोजन याबाबत दिवटे यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. काही ठिकाणी कामांमध्ये होत असलेल्या विलंबाची त्यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित कंत्राटदारांना निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे सक्त निर्देश दिले.

प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, तसेच प्रत्येक प्रकल्पासाठी सविस्तर ‘बार चार्ट’ तयार करून त्याचे नियमित परीक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यापुढे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला एक बैठक कार्यालयात आणि एक प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महापालिकेकडून विविध महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात असून, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.

See also  कै. ज्ञानेश्वर दगडोबा पाषाणकर यांचे निधन