पुणे : बोपोडी मुख्य चौकातील के. एस. स्वीट मार्ट परिसरात रस्त्याच्या खोदकामादरम्यान सार्वजनिक जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या पाणीगळतीमुळे पाण्याची नासाडी झाली असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई करून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अन्वर शेख यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित विभागांकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
बोपोडी परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी सलग तीन दिवस सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागला, तर त्यानंतर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. त्यातच आता सार्वजनिक जलवाहिनी फुटल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात किती पाणी वाया गेले, याचे अधिकृत मोजमाप उपलब्ध नसले, तरी या घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बोपोडी मुख्य चौकातील रस्ता अरुंद असल्याने वारंवार होणारे खोदकाम, रस्त्यावर लावलेले बॅरिकेड्स आणि अपूर्ण कामांमुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. बोपोडी सिग्नल ते खडकी स्टेशनदरम्यान वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे खोदकामाचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.खोदकामापूर्वी संबंधित जलवाहिन्यांची माहिती तपासण्यात आली होती का, आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधण्यात आला होता का, याची चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे. खोदकामाचे आदेश कोणी दिले, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती कशी झाली आणि कामावर देखरेख करण्याची जबाबदारी कोणाकडे होती, याचीही तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
खोदकामापूर्वी संबंधित जलवाहिन्यांची माहिती तपासण्यात आली होती का, आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधण्यात आला होता का, याची चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे. खोदकामाचे आदेश कोणी दिले, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती कशी झाली आणि कामावर देखरेख करण्याची जबाबदारी कोणाकडे होती, याचीही तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही लोकप्रतिनिधीचा नियमबाह्य हस्तक्षेप किंवा गैरवर्तन पुराव्यांनिशी सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करावी. मात्र, कोणावरही पुराव्याशिवाय आरोप न करता अधिकृत कागदपत्रांच्या आधारे चौकशी करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या प्रकरणात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करावी, आवश्यकतेनुसार कंत्राट रद्द करावे आणि संबंधित जलवाहिनीच्या दुरुस्तीचा खर्च तसेच पाण्याच्या नुकसानीचे अधिकृत मूल्यांकन करून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यायोग्य बाब आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करणे, पाण्याची नासाडी थांबविणे, खोदकामानंतर रस्ता पूर्ववत करणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे शेख यांनी नमूद केले आहे. चौकशीचा निष्कर्ष, नुकसानीचा अंदाज आणि केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल तक्रारदाराला देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
“बोपोडीकरांना आश्वासने नकोत, जबाबदारी आणि ठोस कारवाई हवी. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना सार्वजनिक जलवाहिन्यांमधून पाणी वाया जाणे गंभीर आहे. केवळ जलवाहिनी दुरुस्त करून प्रकरण संपवू नये; नुकसान कोणी केले, परवानगी कोणी दिली आणि नुकसानभरपाई कोण देणार, हे स्पष्ट झाले पाहिजे,” अशी भूमिका अन्वर शेख यांनी व्यक्त केली.
महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी व दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.















