पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महापौर नागपुरे यांनी महापालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांनाही पुष्प अर्पण करण्यात आले.
ध्वजारोहणापूर्वी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सादर करण्यात आले. सकाळी ७.१० वाजता ध्वजारोहण व ध्वजवंदन पार पडले. यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्य गीतही म्हणण्यात आले.
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















