संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी; आरती आंबी यांच्या विनयभंगाची तक्रार दाखल करून घेण्याचीही मागणी
पुणे : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता पुण्यातही पोहोचला आहे. कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी, आरती आंबी आणि आमदार रोहित पवार यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.
यावेळी कोथरूडमध्ये भावना दुखावल्याप्रकरणी ज्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, त्याचप्रमाणे आरती आंबी यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराची विनयभंगाची तक्रार दाखल करून घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर संतोष पंडित यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यावेळी ज्या तत्परतेने कारवाई केली, त्याच तत्परतेने कोल्हापुरातील घटनेप्रकरणीही कारवाई करावी, अशी मागणी प्रशांत आंबी यांनी केली.
मात्र, कोथरूड पोलिसांनी आंबी यांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. आरती आंबी या तक्रार देण्यासाठी कोथरूड पोलीस ठाण्यात आल्या होत्या.
प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने स्वतंत्र गुन्हा नाही
प्रशांत आंबी यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराप्रकरणी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाच्या तपासाला न्यायालयाने परवानगी दिली असून, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या घटनेचा तपास करत आहेत.हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्याच घटनेप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत DCP सागर कवडे यांनी माहिती दिली.
















