पुणे : आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील २०२२ मधील सरळसेवा भरती प्रक्रियेत कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस भरती प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.
पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष Raviraj Kale यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेतील काही विभागांत नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात राजेंद्र बबनराव खेडेकर, नमिता बनसोडे आणि शिवानंद बाळासाहेब पाटील यांच्या टोळीने संगनमताने उमेदवारांकडून प्रत्येकी सुमारे ४५ लाख रुपये उकळल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधितांना बनावट नियुक्ती आदेश आणि प्रशिक्षण आदेश देण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या कथित गैरव्यवहारात पुणे महानगरपालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि सह्यांचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप ‘आप’ने केला आहे. या प्रकारामुळे प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असून, बेरोजगार तरुणांच्या भविष्याशी खेळ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, तसेच महापालिकेतील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
यासंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची भेट घेऊन या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.
“हा केवळ आर्थिक गुन्हा नसून प्रशासकीय व्यवस्थेचा गैरवापर करून तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक होणे गरजेचे आहे,” असे Raviraj Kale यांनी म्हटले आहे.
















