शिवकालीन शस्त्रपरंपरेचा ऐतिहासिक ठेवा उलगडणाऱ्या ‘शिवकालीन शस्त्रास्त्रांची मार्गदर्शिका’ ग्रंथाचे भव्य प्रकाशन संपन्न

पुणे : हिंदू युवा प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात भारतीय पारंपरिक शस्त्र संशोधक तथा संग्रहक राकेश धावडे-पवार (सरपाटील) लिखित “शिवकालीन शस्त्रास्त्रांची मार्गदर्शिका” या ऐतिहासिक व अभ्यासपूर्ण ग्रंथाचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन संपन्न झाले. या सोहळ्यास इतिहासप्रेमी, शिवभक्त, साहित्य अभ्यासक तसेच युवा वर्गाची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.

या ग्रंथाचे प्रकाशन माजी खासदार व भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास संशोधक  पांडुरंग बलकवडे, कोर हेरिटेज संस्थेच्या सचिव श्रीमती वर्षा कोटफोडे, श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार, मोडी लिपी तज्ञ अशोक पाटील तसेच हिंदू युवा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ बेंद्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामागील शस्त्रसामर्थ्याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारा हा ग्रंथ राजकोशातील ऐतिहासिक नोंदींवर आधारित असून तलवार, भाला, ढाल, तोफा यांसारख्या विविध शस्त्रास्त्रांचे प्रकार, निर्मिती प्रक्रिया, उपयोग आणि ऐतिहासिक संदर्भांचे सखोल विवेचन यात करण्यात आले आहे. संशोधक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींसाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण संदर्भसंपदा ठरणार असून भारतीय शस्त्रपरंपरेचा वैज्ञानिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा समजून घेण्यासाठी मोलाचे योगदान देणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रदीपदादा रावत यांनी भारतीय इतिहास आणि विशेषतः शिवकालीन शस्त्रपरंपरेवर अधिकाधिक संशोधनपर लेखन व्हावे, असे आवाहन केले. तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ या विषयासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी राकेश धावडे यांच्या कार्याचा आढावा घेत शिवकालीन शस्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांची रचना आणि निर्मिती प्रक्रियेवर सविस्तर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहासाचे समर्पक संदर्भ देत श्री विश्वास कळमकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री लोकेश कोंढरे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अरविंद वारूळे, किरण शिंदे, विशाल पवार, ओंकार घोलप, राहुल चव्हाण आणि वैभव कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.

See also  पालिका शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी शाळांमध्ये सुधारणा करणार -आमदार सिद्धार्थ शिरोळे