बोपोडी : चिखलवाडी येथील पाणी टाकी परिसरातील स्थानिक नागरिकांनी संपर्क साधून काही मुले जलटाकीमध्ये पोहण्यासाठी उतरतात, अशी अत्यंत गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून कोणतीही अनुचित घटना घडू शकते. तसेच ही जलटाकी परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित असल्यामुळे हा विषय सार्वजनिक सुरक्षेसोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत संवेदनशील आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका तथा शहर सुधारणा समितीच्या उपाध्यक्षा सौ. सपना आनंद छाजेड यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली.
नागरिकांकडून असेही सांगण्यात आले की, सध्या या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था फक्त एका शिफ्टमध्ये असल्यामुळे उर्वरित वेळेत अशा प्रकारांना आळा घालणे कठीण होत आहे. त्यामुळे या परिसरात अधिक सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभाग प्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असून, संपूर्ण प्रकरणासंदर्भात अधिकृत लेखी तक्रार देखील प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांची सुरक्षितता, मुलांचे संरक्षण आणि स्वच्छ पाणीपुरवठा यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे.
















