नाल्याच्या प्रवाहातील अडथळे त्वरित काढा – सौ. मंजुश्री खर्डेकर.

पुणे : वारजे-कर्वेनगर परिसरातील नाल्यांच्या प्रवाहातील अडथळे तातडीने हटवून नालेसफाईची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. पावसाळ्यात नाल्याचे पाणी कोणत्याही सोसायटीमध्ये शिरल्यास जनआंदोलन उभारले जाईल आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानच्या डीपी रस्त्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर सुरू असलेल्या कल्वर्ट (छोटा पूल) बांधकामाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारींची दखल घेत नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेवक सुनील पांडे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रशासन व रुग्णालय व्यवस्थापनाला विविध सूचना दिल्या.
नगरसेवक पुनीत जोशी आणि सुनील पांडे यांनी नालेसफाई तसेच नाल्यातून सुरू असलेल्या मलवाहिनी टाकण्याच्या कामाची झाडाझडती घेत पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुढील आठवड्यात मलवाहिनी प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर करून प्रत्यक्ष जागेवर पुन्हा पाहणी करण्याचे आदेशही देण्यात आले.
दीनानाथ रुग्णालयाकडून उभारण्यात येणाऱ्या कल्वर्टमुळे नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन पावसाळ्यात पाणी सोसायट्यांमध्ये शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी “प्रायमूव्ह”चे अजित ओक यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी तातडीने पारदर्शक सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे मान्य केले आहे.
तसेच नाल्यात टाकण्यात आलेले सिमेंट ब्लॉक आणि इतर बांधकामातील डबर त्वरित हटवण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या. त्यावर रुग्णालय प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
वकीलनगर परिसरातील ड्रेनेज लाईन मुख्य मलवाहिनीला जोडण्यात आलेली नसल्याने सांडपाणी तुंबत असल्याच्या समस्येवरून नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक सुनील पांडे आणि पुनीत जोशी यांनी प्रशासनाला धारेवर धरत पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची तंबी दिली.
या पाहणी दौऱ्यात दीनानाथ रुग्णालयाचे डॉ. योगेश भोपे, अभियंता अमोल साने, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, उपअभियंता विनायक शिंदे, कनिष्ठ अभियंता नीलाक्षी तडसे, शुभम असवले, रोहन दिवटे, भाजपा पदाधिकारी तसेच वकीलनगर, सुशीलानगरी, हिमाली संकुल, संजीवनी आणि इतर सोसायट्यांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून दिलेल्या सूचनांनुसार कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

See also  नवचैतन्य हास्य योग परिवाराचे सदस्य चंद्रकांतदादांवर खुश- मकरंद टिल्लू