हरित पुणे, समृद्ध पुणे मोहिमेचा शुभारंभ; ५ रुपयांत स्थानिक वृक्षांची रोपे उपलब्ध

पुणे, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पुणे महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने “हरित पुणे, समृद्ध पुणे” मोहिमेअंतर्गत वनमहोत्सव, वृक्षारोपण आणि बीज संकलन केंद्र उपक्रमाचा शुभारंभ छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता येथे करण्यात आला.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अल्प दरात रोपे विक्री, वृक्षारोपण तसेच बीज संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य समन्वयक विश्वस्त मकरंद टिल्लू, अॅड. राजेंद्र आगरवाल, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि शहराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात पुणे शहरात स्थानिक जातींच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते इच्छुक नागरिक, वृक्षप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांना रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीराजे उद्यान परिसरात ‘बेल’ प्रजातीच्या वृक्षाचे रोपणही करण्यात आले.

या उपक्रमाला सहमहापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. अशोक घोरपडे, मुख्य अभियंता राजेश बनकर, उद्यान अधीक्षक संतोषकुमार कांबळे, प्रिती प्रसाद, स्नेहल हरपळे, सहाय्यक उद्यान अधीक्षक रत्नाकर करडे यांच्यासह उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत तसेच विविध उद्यानांमध्ये लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गतही वृक्षलागवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

वनमहोत्सव उपक्रमांतर्गत ५ जून ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एक ते दीड वर्षे वयाच्या स्थानिक जातींच्या रोपांचे केवळ ५ रुपये प्रति रोप या सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी फळझाडांच्या बिया, बीजगोळे आणि रोपनिर्मितीसाठी उपयुक्त बीज संकलन केंद्रात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत निर्मित सेंद्रिय खतही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

See also  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली विजयस्तंभ परिसराची पाहणी

हा उपक्रम १४ ऑगस्टपर्यंत छत्रपती संभाजीराजे उद्यान येथील रोपवाटिकेत सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत (रविवार व शासकीय सुट्ट्या वगळून) सुरू राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घेऊन हरित पुणे अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.