पावसाळ्यापूर्वी बाणेर रोडवरील वाहतूक व मेट्रो कामांची अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून संयुक्त पाहणी; संबंधित विभागांना तातडीच्या सूचना

पुणे, दि. १२ जून २०२६ : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाणेर रोडवरील विविध समस्या सोडविण्याच्या उद्देशाने अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) ओमप्रकाश दिवटे यांनी शुक्रवारी हॉटेल ग्रीन पार्क ते विद्यापीठ चौक या मार्गावरील रस्ते, मेट्रोची कामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची संयुक्त पाहणी केली.

या पाहणीदरम्यान विद्यापीठ चौक व हॉटेल महाबळेश्वर परिसरात मागील पावसाळ्यात पाणी साचल्याने निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. विद्यापीठ चौकापासून संपूर्ण मार्गावरील पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी पीएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाने चार दिवसांच्या आत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.

सिंध सोसायटी व नॅशनल सोसायटीसमोरील मेट्रो कामाच्या ठिकाणी पडून असलेल्या राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांमध्ये विस्कळीत डिव्हायडर, असमतल रस्ते, नादुरुस्त पदपथ, कमी झालेली रस्त्याची रुंदी आणि आयसर संस्थेसमोरील बंद पावसाळी वाहिनी यांचा समावेश असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विद्यापीठ चौक परिसरात व्हीव्हीआयपींची वारंवार वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर औंधकडे जाणाऱ्या जंक्शनजवळ पाणीपुरवठा विभागाने केलेल्या खोदाईचे काम दोन दिवसांत पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरवर्षी पावसाळ्यात मेट्रोच्या कामांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मेट्रो विभागाने पथ विभाग व इतर संबंधित विभागांसमवेत संयुक्त पाहणी करून तातडीने समस्यांचे निराकरण करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी दिले. याशिवाय, संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि ड्रेनेज विभागाला पावसाळी वाहिन्या व चेंबर्सची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले असून पदपथांवरील राडारोडा त्वरित हटविण्याच्या सूचनाही मेट्रो विभागाला देण्यात आल्या आहेत.

या संयुक्त पाहणीस अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ती गायकवाड,पीएमआरडीएचे उपअभियंता गजानन पाटील, PITCMRL चे उपअभियंता सुमित यादव, प्रोजेक्ट मॅनेजर योगेश मंद्रा, सेक्शन इंचार्ज राज धनशेट्टी तसेच पीएमआरडीए, मेट्रो, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

See also  सुसगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त दिलीप मुरकुटे यांच्या वतीने ३२ महिला भगिनींचा 'महिला सन्मान पुरस्कार' देउन गौरव