पाषाण चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची चाचपणी; निम्हणमळा रस्त्यांच्या कामांना गती देण्याच्या कोकाटे यांच्या सूचना

पाषाण : पाषाण गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तसेच निम्हणमळा परिसरातील रखडलेल्या रस्ते व विकासकामांना गती देण्यासाठी सोमवारी (दि. २१ सप्टेंबर) पाहणी दौरा करण्यात आला.

नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. राहुल कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाषाण चौक तसेच निम्हणमळा परिसराची पाहणी करण्यात आली.

पाषाण चौकात दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, वाहनांच्या तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागतात. त्यामुळे नागरिक, नोकरदार तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

DRDOच्या जागेत ग्रेड सेपरेटरचा प्रस्ताव
पाषाण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी DRDOच्या जागेत त्यांच्या संमतीने ग्रेड सेपरेटर उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच या प्रस्तावाबाबत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

निम्हणमळा मार्गे सोमेश्वरवाडीकडे पर्यायी रस्ता
पाषाण चौकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी डिफेन्स हद्दीला लागून असलेला निम्हणमळा मार्गे सोमेश्वरवाडीकडे जाणारा पर्यायी रस्ता विकसित करण्याबाबतही पाहणी करण्यात आली. याशिवाय निम्हणमळा येथील सर्व्हे क्रमांक ४ मधून सुस रस्त्याला जोडणाऱ्या २४ मीटर रुंदीच्या नियोजित DP रस्त्याचे तसेच त्यावरील पुलाचे काम तातडीने आखून त्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी श्री. राहुल कोकाटे यांनी सांगितले की, “डिफेन्सची जमीन अधिग्रहित करण्यासंदर्भात मनपाचे नियोजित आराखडे तयार करून लवकरच DRDO प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसेच निम्हणमळा परिसरातील रस्ते विकसित करताना स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य मोबदला देऊनच कामे केली जातील.”

या पाहणी दौऱ्यावेळी पुणे मनपाचे प्रकल्प प्रमुख दिनकर गोजारी, पथ विभाग प्रमुख राजेश बनकर, अधीक्षक अभियंता राजेश वाघमारे, निलेश निम्हण, गणेश निम्हण, उत्तम जाधव, विराज कोकाटे उपस्थित होते.

See also  संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण