स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या सुतारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची मागणी

पुणे, दि. १३ जून : सुतारवाडी, पाषाण येथील कै. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण शाळा क्रमांक १३५ व ७१ ची इमारत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक व वापरासाठी अयोग्य ठरल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने स्थलांतर करण्याची मागणी पुढे आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार संबंधित इमारत ‘C-1’ श्रेणीत वर्गीकृत करण्यात आली आहे. या श्रेणीतील इमारती धोकादायक असून त्यांचा वापर करणे सुरक्षित नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे इमारत पाडून नव्याने बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे.

यासंदर्भात पुणे महापालिकेच्या सदस्य, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या रोहिणी चिमटे यांनी शिक्षण मंडळ विभागाला पत्र देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी ठिकाणी वर्ग भरविण्याची मागणी केली आहे. पाषाण-बाणेर लिंक रोड परिसरातील नवीन संत तुकाराम शाळेची इमारत उपलब्ध असून तेथे विद्यार्थ्यांना बसण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, भवन रचना विभागाने शिक्षण विभागाला पाठविलेल्या पत्रात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवीन शाळा इमारतीच्या उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.

स्थानिक नागरिक व पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत महापालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शाळेची नवीन इमारत उभी राहेपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
— पुणे बुलेटिन

See also  लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ