बाणेरमध्ये नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे; नागरिकांमध्ये संताप

पुणे, प्रतिनिधी : बाणेर परिसरातील एसबीआय बँकेजवळ व ऑर्किड शाळेसमोरील रस्त्याचे १२ जून रोजी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र अवघ्या आठवडाभरातच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडू लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच डांबरीकरण उखडण्यास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
नागरिकांनी याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार केली असता, विविध विभागांकडून या कामाची जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम नेमके कोणत्या विभागामार्फत करण्यात आले, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, डांबर उपलब्ध नसल्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामांमध्ये अडचणी येत असल्याचे काही अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर एवढ्या कमी कालावधीत खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. बाणेर परिसरातील सार्वजनिक कामांच्या गुणवत्तेबाबतही यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

See also  एमआयटी एडीटी’च्या 'कंजूस' ने गाजवला भारत रंग महोत्सव