औंधमध्ये गॅस लाईन खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था; नागरिक त्रस्त

पुणे, प्रतिनिधी( संजय मोरे) : औंधमधील पोलीस मोटार परिवहन मंडळ चौक ते औंध गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गॅस लाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आलेल्या या कामानंतर अद्याप रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी खोदकाम करून अनेक आठवडे उलटले तरी रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही. खोदकामामुळे रस्त्यावर माती, खडी आणि दगड साचले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वळणाच्या ठिकाणीच खोदकाम करण्यात आल्याने दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अनेकदा वाहने घसरल्याच्या घटना घडत आहेत.

याशिवाय रस्त्याच्या कडेला साईड कट तयार झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पावसामुळे रस्त्यावरील माती आणखी सैल होत असून परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. दररोज या मार्गाचा वापर करणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) आणि संबंधित ठेकेदारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खोदकामानंतर रस्ते त्वरित पूर्ववत करण्याचे नियम असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

“खोदकाम करून रस्ते दुरुस्त न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

See also  परिवर्तन महाशक्ती व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा महायुतीला मोठा धक्का, माजी खासदार शिवाजी माने यांचा प्रवेश