गोखलेनगरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून हल्ल्याची शक्यता

पुणे, १८ जून (प्रतिनिधी): गोखलेनगर येथील एकतानगर सोसायटी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद मच्छिंद्र जाधव (वय २०) हा १८ जून २०२५ रोजी पहाटे सुमारे २.३५ वाजण्याच्या सुमारास एकतानगर सोसायटी परिसरात असताना तीन ते चार अज्ञात इसमांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आरोपींनी हर्षदवर लाकडी दांडके, क्रिकेट बॅट आणि विटांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके कामाला लागली आहेत.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीमती शीतल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात येत आहे.

या हत्येमुळे गोखलेनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

See also  प्रभाग क्रमांक ९ बाणेर मध्ये ज्योती चांदेरे यांचा घरोघरी प्रचार; नागरिकांशी थेट संवाद