गुरुवर्य गजानन पाटील स्मृती पुरस्कारांनी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

पुणे: शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित झालेले मार्गदर्शक तथा माजी क्रीडा अधिकारी गुरुवर्य गजानन मारुती पाटील यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त २१ जून रोजी पुणे येथील पत्रकार भवन सभागृहात गुणवंत खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

कै. गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ डॉ. गौरी पाटील यांनी २०२१ मध्ये ‘गुरुवर्य गजानन पाटील क्रीडा प्रतिष्ठान’ची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे चौथे वर्ष होते.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू तसेच प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना यावेळी सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय खेळाडू, कुस्तीतील अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान काका पवार तसेच आचार्य चाणक्य शिक्षाविद पुरस्काराने सन्मानित डॉ. विश्वंभर जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यंदाचा ‘मार्गदर्शक क्रीडा पुरस्कार’ श्री. भास्कर भोसले यांना प्रदान करण्यात आला. तर ‘उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार’ अरुण ध्यानसिंग राठोड आणि स्नेहल भाऊसाहेब खरात यांना देऊन गौरविण्यात आले.

यावेळी माजी खेळाडू श्री. संजय शिंदे, प्रीती शिवगुंडे, गणेश सातपुते आणि रणजीत पाडाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच भवनीत कौर, साची पांडे, अनन्या पाटील आणि नील वारके यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास माजी रणजी कर्णधार श्रीकांत जाधव, निवृत्त उपसंचालक जनक टेकाळे, डीवायएसपी संपत भोसले, दत्ता झोडगे, अजिंक्य जाधव, मधुकर पाटील, रिद्धी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात साची पांडे हिच्या स्वागत गीताने झाली. डॉ. गौरी पाटील यांनी प्रास्ताविक करून प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. दत्ता झोडगे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा जाधव-पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

गुरुवर्य गजानन पाटील यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे गुणवंत खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या कार्याचा गौरव होऊन नवोदितांना प्रेरणा मिळाली.

See also  पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार,किल्ले पुरंदर येथील शासकीय जयंती कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा