खाजगी ट्रॅव्हल एजंन्सीच्या दलालांची शिवाजीनगर एसटी स्थानकात दहशत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची कारवाईची मागणी

पुणे : खाजगी ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या दलालांची शिवाजीनगर एसटी स्टँड परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याचा त्रास प्रवासी आणि परिवहन खात्याला होत असल्याने एजंट विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आज (मंगळवारी) केली.

भाजप आमदार सिद्धार्थ अनिल शिरोळे यांनी परिवहन विभागाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण आणि गंभीर विषयावर सरकारचे लक्ष वेधले. आमदार शिरोळे यांनी पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्टँडच्या सद्यस्थितीचा उल्लेख करत खासगी ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या दलालांचा (एजंट्स) मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

या बेकायदेशीर दलालांची एसटी स्टँड परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, याचा त्रास केवळ प्रवाशांनाच नव्हे तर ‘राज्य परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. दलालांच्या वाढत्या प्रभावामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

परिवहन विभागाच्या ‘भरारी पथक’ अधिक सक्षम करून दलालांवर विशेष आणि कठोर कारवाई करण्यात येईल का?, स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांसोबत नियमितपणे समन्वय साधून संयुक्त कारवाई केली जाईल का? असे प्रश्न आमदार शिरोळे यांनी उपस्थित केले.

आमदार शिरोळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारच्या दलालांविषयी कोणतीही माहिती किंवा तक्रार आल्यास भरारी पथकाला त्वरित निर्देश देऊन कठोर कारवाई केली जाईल. तसेच, बेकायदेशीर दलाल आढळल्यास त्यांना तातडीने पोलिसांच्या ताब्यात देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री महोदयांनी सभागृहाला दिले.

See also  मराठा समाजाच्या वतीने कुंदन गार्डन बाणेर येथे 24 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन