ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीला कीर्तीशक्ती फाऊंडेशनचा मदतीचा हात

पुणे : राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या “स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा विभाग” अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थी MPSC, UPSC तसेच विविध महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. अत्यंत सामान्य आणि खडतर परिस्थितीतून आलेले हे विद्यार्थी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या केंद्रात राहून अथक परिश्रम घेत आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना विविध संदर्भग्रंथ, अभ्यास साहित्य आणि इतर शैक्षणिक साधनांची आवश्यकता असते. या गरजा ओळखून *कीर्तीशक्ती फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. कल्याणी टोकेकर आणि सौ. शिखा नीखरा* यांनी संस्थेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी आणि त्यांच्या तयारीचा आढावा घेत, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याकरिता कीर्तीशक्ती फाऊंडेशनतर्फे आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.

यावेळी बोलताना, “विद्यार्थी आणि तरुणांच्या कौशल्यविकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी कीर्तीशक्ती फाऊंडेशन सदैव कटिबद्ध राहील,” असा विश्वास विद्यार्थ्यांना देण्यात आला.

तसेच, नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२६ च्या पूर्व परीक्षा (Preliminary) निकालात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. आगामी मुख्य परीक्षा (Mains) तयारीसाठी त्यांना शुभेच्छा देत अधिक जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारे हे सहकार्य त्यांच्या यशाच्या प्रवासात निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

See also  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा