मुंबई/भिवंडी, प्रतिनिधी : देशभरात नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडी येथे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने २८ जून २०२६ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, राज्यातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर रविवारी (२८ जून) टीईटी परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी सुमारे दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.
दरम्यान, २७ जूनच्या पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित संशयास्पद माहिती आढळल्याने तपास सुरू करण्यात आला. या पार्श्वभूमीवर परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जूनची शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. परीक्षेची नवीन तारीख व इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, पेपरफुटी प्रकरणाचा तपास भिवंडी पोलिसांकडून सुरू आहे.















