शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून कथित गोळीबार; बावधन पोलिसांची तात्काळ कारवाई

पुणे, दि. २ जुलै : पुण्यात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून  गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बावधन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चांदेरे यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बाळासाहेब चांदेरे हे गाडीतून उतरताच पाच ते सहा जणांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जमिनीच्या वादावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर  गोळीबार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चांदेरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील पिस्तूल जप्त करण्यात आले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

गोळीबार नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, किती फायर झाले, तसेच या घटनेत कोणी जखमी झाले आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस तपासानंतरच संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  खडकवासल्याचा “श्रावण बाळ” संदीप भाऊ मतेंना सहकार्य करा आमदार सचिन अहिर यांचे आवाहन