बालेवाडी–वाकड मिसिंग लिंकवरून अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा

पुणे : बालेवाडी ते वाकड मिसिंग लिंक रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. एक वर्षापूर्वी या रस्त्याच्या कामाच्या पाठपुराव्यासंदर्भात पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीची जुनी बातमी सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी, “आज या बातमीला एक वर्ष पूर्ण झाले. दादा, तुमच्या भुतासारख्या पाठलागाची बालेवाडी–बाणेरमधील जनता अजूनही वाट पाहत आहे,” असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.

यापूर्वीही काही आठवड्यांपूर्वी अमोल बालवडकर यांनी भोंदू बाबा खरात यांच्यासोबतचा चंद्रकांत पाटील यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत “उच्च तंत्र व मंत्र शिक्षण मंत्री” अशी उपरोधिक टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा मिसिंग लिंक रस्त्यांच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मंत्री पाटील यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बालेवाडी, बाणेर आणि वाकड परिसरातील मिसिंग लिंक रस्त्यांसाठी गेल्या अनेक वर्षांत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका झाल्या. मात्र, त्यानंतरही रस्त्यांची कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, पाषाण–सुतारवाडी परिसरातील काही रस्त्यांची कामे तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ रखडल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या रखडलेल्या प्रकल्पांमुळे बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

यामुळे मिसिंग लिंक प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठीच राबवला जात आहे का, की तो केवळ कागदावरच राहणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. रखडलेले रस्ते नेमके कधी पूर्ण होणार, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

See also  समाजाच्या कल्याणासाठी राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेणे शक्य- विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे