एमआयटी-एडीटीला ‘खेलो इंडिया’साठी ‘साई’ची मान्यता

पुणेः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाला रोइंग या क्रीडा प्रकारासाठी प्रतिभावान खेळाडूंचा (मुले व मुली) शोध घेणे व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) कडून खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र (निवासी) म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. अशाप्रकारे, क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘साई’ची मान्यता मिळणारे एमआयटी एडीटी विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.


एमआयटी एडीटी विद्यापीठातील क्रीडा संकुल हे जागतिक सोईसुविधांनी सुसज्ज आहे. विद्यापीठातील डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी स्पोर्ट्स अकादमीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडून रोइंग, बॉक्सिंग व जलतरण या खेळांसाठी अकादमीची स्थापना करत खेळाडूंना प्रशिक्षणाचे काम केले जाते. त्याच्या परिणामतः रोइंग अकादमीतील खेळाडूंनी आजवर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना पदक जिंकूण विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गतवर्षी विद्यापीठातील स्कूल ऑफ लाॅ’चे प्रा.आदित्य केंदारींनी आशियाई इनडोअर रोइंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकाविले होते.


या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड म्हणाले, विद्यापीठाच्या रोइंग अकादमीला आता खेलो इंडियासाठी साईची मान्यता मिळाल्याने या क्रीडा प्रकारात रुची असणाऱ्या पुणे व परिसरातील खेळाडूंना या खेळाच्या प्रशिक्षणासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
या यशानंतर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा.पद्माकर फड यांनी क्रीडा विभागाचे अभिनंदन केले आहे.

राज्य सरकारच्या लक्ष्य वेधसाठीही निवड
‘साई’सह महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या लक्ष्य वेध योजनेतही रोइंग क्रीडा प्रतिभा विकास प्रकाराचे प्रशिक्षण केंद्र म्हणून डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी स्पोर्ट्स अकादमीची निवड झाली आहे. तसेच, रोइंग खेळाडू म्हणून भाग्यश्री घुले, अनुष्का गर्जे आणि प्रशिक्षक म्हणून सुहास कांबळे यांना मान्यता मिळाली आहे.

See also  भारतीय बाजारात सोन्याला झळाळी. प्रति १० ग्राम ६० हजाराच्या पार.