पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचा पुणे महापालिका आयुक्त यांचेकडून आढावा

पुणे : पुणे शहरात काल झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे मा.महापालिका आयुक्त, श्री.नवल किशोर राम यांनी आज आपत्ती व्यवस्थापना संदर्भात सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीमध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून कालच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसेच त्यावर करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती, झाडे पडण्याच्या घटना, त्यामागील कारणे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले.

तसेच पावसामुळे बाधित क्षेत्रांमधून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, त्यांच्यासाठी करण्यात आलेली निवारा, अन्न, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था याचाही आढावा घेण्यात आला.

यावेळी आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बाधित भागांमध्ये तातडीने आणि युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर आवश्यक मार्गदर्शन व उपाय सुचविण्यात आले.

या बैठकीस पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), श्री. प्रजित नायर, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

See also  पुणे शहर जिल्हा इंटक काँग्रेसच्या अध्यक्षपदी चेतन आगरवाल