विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न

पुणे, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमाच्या अनुषंगाने २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक मतदार नोंदणी अधिकारी सचिन गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजीनगर येथील घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात पार पडली.

बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची जबाबदारी, घरभेट मोहीम, गणना भरण्याची प्रक्रिया, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दावे व हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया तसेच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना करण्यात आले. तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, दुबार व मृत मतदारांची नावे वगळणे आणि पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
— पुणे बुलेटिन

See also  ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या धरणे आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा