पुणे, ता. ३० : पंजाबमधील ‘न्यू मोती बाग गन क्लब’ येथे २२ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘राजा रणधीर सिंग मेमोरियल इंडियन शॉटगन ओपन शूटिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत पुण्यातील १० वीची विद्यार्थिनी कुमारी अनन्या अभिजीतसिंह जाधव हिने उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली.
‘क्ले पिजन डबल ट्रॅप शूटिंग’ प्रकारात देशभरातील सुमारे १८० नेमबाजांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत अनन्याने २८ जुलै रोजी ‘ज्युनिअर’ आणि ‘महिला’ या दोन्ही गटांत उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन करत सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले.
अनन्याची ही दुहेरी सुवर्ण कामगिरी तिच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीचे फलित मानली जात आहे. ती सध्या पुण्यातील बालेवाडी येथे प्रशिक्षक श्री. हेमंत बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रशिक्षण घेत असून, या यशामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
अनन्याच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ती भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
















