म्हाळुंगे-सुस रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेत नगरसेविका मयुरी कोकाटे यांची आयुक्तांसोबत बैठक; तातडीने कामे सुरू करण्याचे आयुक्तांचे निर्देश

पुणे, ता. ३० : म्हाळुंगे व सुस परिसरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था, वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. मयुरी राहुल कोकाटे यांनी गुरुवारी पुणे महानगरपालिकेत आयुक्त नवल किशोर राम, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे आणि पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी परिसरातील विविध समस्यांबाबत निवेदनही सादर करण्यात आले.

बैठकीत नगरसेविका मयुरी कोकाटे यांनी म्हाळुंगे आणि सुस परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था तातडीने सुधारण्याची मागणी केली. तसेच आराखडा (आर.पी.) रस्त्यांची लवकर आखणी करून त्यांचा विकास करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

यावर आयुक्त नवल किशोर राम आणि उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित प्रशासनाला सुस व म्हाळुंगे येथील आर.पी. रस्त्यांची त्वरित आखणी करून विकास प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

वाहतूक कोंडीच्या समस्येवरही बैठकीत चर्चा झाली. यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्तांनी नगरसेविका मयुरी कोकाटे यांना दिली.

या बैठकीमुळे सुस व म्हाळुंगे परिसरातील रखडलेली रस्त्यांची कामे आणि वाहतूक समस्यांवर लवकरच ठोस कार्यवाही होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

See also  नीरा कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न