पुणे : म्हाळुंगे गाव परिसरातील स्पेशल टाऊनशिपअंतर्गत विकसित होत असलेल्या व्ही.टी.पी. सॉल्टेर, रहेजा, गोदरेज यांसारख्या नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांमध्ये राहणाऱ्या सुमारे आठ हजार कुटुंबांना गेल्या सहा महिन्यांपासून अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य मयुरी कोकाटे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
स्पेशल टाऊनशिपअंतर्गत गृहप्रकल्पांना परवानगी देताना तेथे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणे तसेच निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे ही संबंधित बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले जात असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला आहे.
सध्या या परिसरात पुरवठा होणारे पाणी अत्यंत दूषित असून ते पिण्यास अयोग्य असल्याचे पुणे महापालिकेच्या प्रयोगशाळेतील तपासणीतून समोर आल्याचा दावा त्यांनी केला. मागील आठवड्यात जगताप यांच्यासमवेत परिसराची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी पाण्याचे नमुनेही घेण्यात आले असून ते नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या परिसरातील आठ हजार कुटुंबांना दररोज किमान १०० टँकर पाणीपुरवठा करणे आवश्यक असताना संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून पुरेसा पाणीपुरवठा केला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे, या प्रकरणी मागील फेब्रुवारी-मार्च महिन्यात केवळ एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. एवढ्या मोठ्या समस्येच्या तुलनेत ही दंडात्मक कारवाई अत्यंत अपुरी असून नागरिकांची दिशाभूल करणारी असल्याची टीका कोकाटे यांनी केली.
जोपर्यंत संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून सर्व आठ हजार कुटुंबांना नियमित आणि पिण्यायोग्य पाणीपुरवठा सुनिश्चित केला जात नाही, तोपर्यंत स्पेशल टाऊनशिपअंतर्गत सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांना कामबंद आदेश (वर्क स्टॉप ऑर्डर) द्यावेत. तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी मयुरी कोकाटे यांनी केली आहे.
















