पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवा क्षेत्रातील द्रष्टे नेतृत्व हरपले

पुणे : माजी राज्यपाल तथा डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत त्यांनी महापौर, लोकप्रतिनिधी आणि पुढे बिहार, पश्चिम बंगाल तसेच त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या प्रशासकीय अनुभवासोबतच शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीमुळे त्यांना देशभरात विशेष ओळख मिळाली.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उभारलेल्या संस्था आज लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि इतर उच्च शिक्षण संस्थांबरोबरच त्यांनी नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारून क्रीडा क्षेत्रालाही मोठे योगदान दिले. कृषी आणि समाजसेवा क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाची नवी दिशा मिळाली. त्यांच्या निधनाने समाजजीवनातील एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहील.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

See also  डोणजे (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी रोहिणी शंकर कुंभार