गुलाबपुष्प, लेखणी अन् सायबर सुरक्षेची शिदोरी; अनंतराव पवार महाविद्यालयात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत

पिरंगुट : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘स्वागत समारंभ व ओरिएंटेशन कार्यक्रम’ उत्साह, आनंद आणि प्रेरणेच्या वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची दिशा, विविध शैक्षणिक विभागांची माहिती, व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी आणि सुरक्षित डिजिटल जीवनाचे महत्त्व समजावून देणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, शुभेच्छापत्र आणि लेखणी देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. ज्ञानाच्या नव्या प्रवासाची सुरुवात लेखणीच्या माध्यमातून व्हावी, हा सुंदर संदेश या स्वागतामागे होता. त्यानंतर आकर्षक सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी छायाचित्रे काढत महाविद्यालयीन जीवनाच्या नव्या पर्वाचा आनंद साजरा केला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला प्रेरणादायी सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ. तानाजी काशीद यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, संशोधनाभिमुख वातावरण आणि नवीन शैक्षणिक वर्षातील नियोजनाची माहिती दिली.त्यानंतर विविध विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील संधींचा परिचय करून दिला. प्रा. भरत कानगुडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०, डॉ. अभय पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. अविनाश रोकडे यांनी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), डॉ. श्रीकांत देशमुख यांनी विद्यार्थी विकास मंडळ, डॉ. दत्तात्रय मांगे यांनी परीक्षा विभाग, डॉ. विजय बालघरे यांनी सांस्कृतिक विभाग, प्रा. अविनाश हुंबरे यांनी ग्रंथालय विभाग तर प्रा. दीप सातव यांनी विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पौड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गौरी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, “डिजिटल युगात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा. वैयक्तिक माहिती, बँक तपशील किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका. संशयास्पद लिंक, फिशिंग संदेश आणि बनावट वेबसाइट्सपासून सावध राहा. मजबूत पासवर्ड आणि द्विस्तरीय सुरक्षा वापरून स्वतःची डिजिटल सुरक्षितता जपा.”

See also  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्‍य केल्याबद्दल माफी मागावी - खा. रजनीताई पाटील केंद्रीय

पुढे त्या म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे. कोणतीही समस्या, छेडछाड, सायबर गुन्हा किंवा अन्य अडचण उद्भवल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधा. पौड पोलीस तुमच्या मदतीसाठी चोवीस तास तत्पर आहेत.” त्यांच्या या आश्वासक संदेशाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नवप्रवेशित विद्यार्थिनी तेजस्विनी कांजणे, सानिका गोरे आणि रिद्धी गुजर यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या स्वागतशील वातावरणाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, “महाविद्यालय हे केवळ पदवी मिळविण्याचे ठिकाण नाही, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची कार्यशाळा आहे. ज्ञानासोबत संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय मूल्ये जोपासणारे विद्यार्थीच उद्याचे सक्षम नागरिक ठरतील.”

कार्यक्रमादरम्यान डॉ. वसुधा नंदनवार यांनी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करून वातावरण अधिक उत्साही केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. विजय बालघरे यांनी केले, तर डॉ. गणेश चौधरी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.