वाहतूक, खड्डे, अतिक्रमण आणि कचरा व्यवस्थापनावर प्रशासनाची धडक बैठक; रस्ते पूर्ववत करण्यासह अनधिकृत पथविक्रेत्यांवर कारवाईचे निर्देश

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन तसेच विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री (नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ) माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

मेट्रो प्रकल्पाच्या विविध कामांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक व रस्त्यांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांवर पडून राहणारा राडारोडा तातडीने हटवून रस्ते पूर्ववत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मंडईच्या भाडेवाढीचा तसेच मेट्रो प्रकल्पामार्फत तयार करण्यात आलेल्या गाळ्यांच्या वाटपाचा प्रश्नही बैठकीत चर्चेला आला. या संदर्भातील प्रलंबित बाबींचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील अनधिकृत पथविक्रेत्यांमुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाने अनधिकृत पथविक्रेत्यांवर नियमानुसार प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

एकता नगर, निंबस नगर आणि विठ्ठलवाडी परिसरातील पुणे महापालिकेच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या प्रगतीतील अडचणी दूर करून कामाला गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

दरम्यान, शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कचरा विलगीकरणाची प्रक्रिया वेगवान आणि कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला. कचरा संकलन व व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सिंहगड परिसरातील भूसंपादन प्रक्रियेलाही गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. रस्त्यांशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

शहरातील वाहतूक, रस्ते, अतिक्रमण आणि कचरा व्यवस्थापनासारखे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासोबतच विविध विकासकामांना गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीस आमदार हेमंत रासने (कसबा), आमदार भीमराव तापकीर (खडकवासला), महापौर मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर, मेट्रो प्रकल्प व्यवस्थापक धनंजय गाडगीळ यांच्यासह पुणे महापालिकेच्या विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  डॉ. नमिता कोहक यांचे बाणेर येथे समर्थ व्याख्यानमाला व कपिला अखिला क्लब हाऊसच्या वतीने व्याख्यान संपन्न