बाणेर : मराठवाड्यातील पूरग्रस्त कुटुंबांना बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून मदतीचा हात देत अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मित्र मंडळ व बाणेर बालेवाडी पाषाण सुस महाळुंगे परिसरातील नागरिकांच्या वतीने सुभाष भोळ, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे यांच्या माध्यमातून मदत संकलन करण्यात आले होते.
मराठवाडा येथील नालगाव, ढगपिंपरी, वडनेर, देवगाव या परंडा तालुक्यातील पूरग्रस्त गावातील शेतकरी बांधवांना अन्नधान्याचे किट, चादरी, कपडे वाटप करण्यात आले. मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी बाणेर बालेवाडी पाषाण सुस महाळुंगे परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून मदत संकलनाचे काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 250 होऊन अधिक कुटुंबांना मदत करण्यात आली. परिसरातील मराठा समाजाच्या वतीने देखील पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात आली.
सदर मदत सुभाष भोळ यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष जागेवर पोहोच करण्यात आली. मराठवाड्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुण्यामध्ये स्थायिक असलेल्या मराठवाड्यातील बांधवांनी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी सहकार्याचे व मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या वतीने सुभाष भोळ यांनी केले आहे.
