पुणे : पुणे शहर आणि लगतच्या परिसराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या खडकवासला धरणाची घटलेली साठवण क्षमता हा गंभीर आणि दीर्घकालीन प्रश्न असून, ती क्षमता पुनर्संचयित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्यांनी राज्यसभेमध्ये प्रश्न उपस्थित करत सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. खडकवासला धरणाची मूळ साठवण क्षमता सुमारे ३.७५ टीएमसी होती. मात्र, गेल्या अनेक दशकांतील गाळ साचण्यामुळे धरणाची प्रभावी साठवण क्षमता निम्म्यापेक्षा अधिक घटल्याचे आणि ती सध्या जवळपास १.७५ टीएमसी इतकी राहिल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
साठवण क्षमतेत झालेल्या या मोठ्या घटीमुळे पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी साठवून ठेवण्याची तसेच पावसाळ्यानंतर वाढती शहरी पाण्याची गरज भागविण्याची धरणाची क्षमता कमी झाली आहे. पुणे हे वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक असून, पिण्याचे पाणी, उद्योग, सार्वजनिक सेवा आणि पर्यावरणीय गरजा यासाठी भविष्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे.
विशेषतः अपुऱ्या पावसाच्या वर्षांमध्ये घटलेली जलसाठवण क्षमता जलव्यवस्थापन यंत्रणेवर मोठा दबाव निर्माण करू शकते. त्यामुळे पुण्याच्या दीर्घकालीन जलसुरक्षेबाबत तसेच सध्याच्या जलसाठवण आणि वितरण व्यवस्थेच्या क्षमतेबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
गाळ काढण्यासह विविध उपाययोजनांची मागणी
खडकवासला जलाशयाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून शास्त्रीय पद्धतीने गाळ काढणे (desilting), पाणलोट क्षेत्रात उपचारात्मक कामे, गाळ व्यवस्थापन, जलाशयाचे आधुनिकीकरण आणि प्रभावी जल अंदाजपत्रक (water budgeting) यांसारख्या उपाययोजनांचा अभ्यास करावा, अशी मागणी त्यांनी केली.
खडकवासला जलाशय प्रणालीचे सविस्तर मूल्यमापन करून त्याची भविष्यातील शाश्वतता निश्चित करणे आवश्यक आहे. पुणे शहरातील लाखो नागरिकांची जलसुरक्षा, शहरी विकास, सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक विकास यांच्याशी हा प्रश्न थेट संबंधित आहे.
आजच योग्य उपाययोजना केल्यास भविष्यात उद्भवणारे मोठे जलसंकट टाळता येऊ शकते, असेही खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आपल्या विशेष उल्लेखात स्पष्ट केले आहे.
















