वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; पुढील ५० वर्षांचा विचार करून उपाययोजना कराव्यात – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा केवळ चर्चेचा विषय न राहता त्यावर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. शहराचा झपाट्याने झालेला भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अपुरा विस्तार यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील काळातील प्रलंबित कामांचा बॅकलॉग भरून काढतानाच पुढील ५० वर्षांचा विचार करून पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.

पुणे शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक मंगळवारी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, वंदना चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, शिवसेना (ठाकरे गट)चे गजानन थरकुडे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोहोळ पुढे म्हणाले की, पुण्याची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली असून ती सुमारे ६० ते ७० लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहराचा भौगोलिक विस्तारही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र, त्या तुलनेत रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार झालेला नाही. शहरातील रस्त्यांची वाढ आठ टक्क्यांपेक्षा अधिक झालेली नसताना सार्वजनिक वाहतुकीचा वापर सध्या केवळ सुमारे ११ टक्के आहे. त्यामुळे नागरी सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

ही वस्तुस्थिती स्वीकारून वाहतूक प्रश्नावर सर्व संबंधित यंत्रणा आणि घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. पुण्याचे नाव जगभरात अभिमानाने घेतले जाते; मात्र सध्या वाहतूक कोंडीचे गालबोट या शहराच्या वैभवाला लागले आहे. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेऊन तातडीच्या उपायांसोबतच दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

महापालिका, पोलीस, पीएमपीएमएल, मेट्रो, परिवहन विभाग, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या सर्वांची वाहतूक सुधारण्यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडल्यास पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणता येईल.

See also  पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही- पालकमंत्री

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. सध्या पुण्याच्या रस्त्यांवर सुमारे १,९७० बसेस धावत आहेत. शहराची वाढती गरज लक्षात घेता पुढील तीन वर्षांत बससंख्या तीन ते चार हजारांनी वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ई-बस उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

बसची संख्या वाढविण्याबरोबरच ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. नागरिकांना घरापासून बस, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपर्यंत सहज पोहोचता आले पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून त्यांच्यात समन्वय निर्माण करणे गरजेचे आहे.

मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मेट्रोचा विस्तारही वेगाने होत आहे. मात्र, सार्वजनिक वाहतुकीतील बससेवा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाली, तर खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल.

नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि नाशिक रस्ता यांसारख्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक समस्यांवर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. शहरातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या ‘मिसिंग लिंक’ दूर करण्याबरोबरच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. काही उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली असून प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

वाहतूक सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी केवळ तात्पुरत्या उपायांच्या आधारे न करता तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करावी लागेल. शहराच्या आजच्या गरजा तसेच पुढील अनेक दशकांतील लोकसंख्या, वाहनसंख्या आणि नागरी विस्तार लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक आहे.

शहराच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्रित विचार करण्याची गरज आहे. ‘माझे पुणे’ हा विचार मनात ठेवून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. वाहतुकीच्या प्रश्नाकडे केवळ मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून न पाहता स्थानिक पातळीवरील छोटे-छोटे प्रश्न शोधून त्यावर प्रभावी उपाय करणे हीदेखील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.

See also  पालिकेच्या नाकावर टिच्चून रस्त्यांवर अनधिकृत आठवडे बाजार सुरूच

मागील काळात राहून गेलेल्या कामांना गती देतानाच पुढील पिढीच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल. आज आपण योग्य निर्णय घेतले नाहीत, तर भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही. पुण्याचा नावलौकिक आणि शहराचे वैभव कायम राखण्यासाठी वाहतुकीचा प्रश्न सर्वांनी एकत्र येऊन सोडवणे आवश्यक आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

वाहतूक सुधारण्यासाठी स्थानिक समित्या स्थापन करणार : अमितेश कुमार
पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. शहरात सध्या ३५ वाहतूक चौक्या असून प्रत्येक चौकीच्या कार्यक्षेत्रातील वाहतूक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक आणि पोलीस यांचा सहभाग असलेल्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.या समित्यांमध्ये सुमारे ४० ते ४५ सदस्यांचा सहभाग असेल. प्रत्येक चौकीच्या हद्दीतील स्थानिक वाहतूक समस्या, अरुंद रस्ते, वाढलेली वाहनसंख्या, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करून त्यावर स्थानिक पातळीवर उपाय सुचवले जातील. या समित्या पुढील आठवडाभरात स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.