पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या पाषाण -सोमेश्वरवाडी परिसरात कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांचा सलग सहाव्या दिवशी गावभेट दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांनी घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत परिसरातील नागरी समस्या, दैनंदिन अडचणी तसेच सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेतला.
या गावभेटीदरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवक, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, स्वच्छतेचा अभाव, ड्रेनेजच्या समस्या, पायाभूत सुविधांतील त्रुटी तसेच स्थानिक रोजगार संधी यासंदर्भात तक्रारी आणि सूचना मांडल्या. या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास बालवडकर यांनी नागरिकांना दिला.
पाषाण -सोमेश्वरवाडी परिसरातील तरुणांच्या कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण, नागरी सुविधा तसेच एकूणच परिसरातील विकासकामांचा सविस्तर आढावा बालवडकर यांनी या दौऱ्यावेळी घेतला.
या वेळी बोलताना लहू बालवडकर म्हणाले, “प्रभाग क्रमांक ९ चा सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास साधणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या तोंडून ऐकून घेणे, त्या समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष, वेळेत व परिणामकारक उपाययोजना करणे हीच माझी कार्यपद्धती आहे. संवाद, विश्वास आणि जबाबदारी या तीन आधारांवर प्रभागाच्या विकासाची पुढील दिशा ठरवली जाईल”
दरम्यान, केंद्रीय मंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ तसेच आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाषाण – सोमेश्वरवाडी परिसरात दर्जेदार, दीर्घकालीन आणि नागरिकाभिमुख विकासकामे करण्यात येतील, असा विश्वास बालवडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
हा गावभेट दौरा पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, प्रत्येक वस्ती, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचा निर्धार बालवडकर यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























