प्रभाग ९ चा निधी शून्य केल्याचा आरोप खोटा; अमोल बालवडकर यांनी दादांचे नाव घेणे बंद करून प्रभागाच्या कामावर लक्ष द्यावे – नगरसेवक पुनीत जोशी

पुणे / कोथरूड : प्रभाग क्रमांक नऊ चा सगळा निधी शून्य करण्यात आला हे खोटे असून प्रभागातील विकास कामांसाठी भरपूर निधी देण्यात आला आहे, असा खुलासा नगरसेवक पुनीत जोशी यांनी केला आहे.

अमोल बालवडकर यांचा हा विषय सह यादीचा आहे. बजेटचा विषय हा महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते यांच्याशी चर्चा करून अमोल बालवडकर यांनी सोडवावा. काही झाले की चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव घ्यायचे. चंद्रकांत दादांना अमोल बालवडकर यांच्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही, असे जोशी म्हणाले.

अमोल बालवडकर माझे मित्र आहेत, मी त्यांना मैत्रीत्वाच्या नात्याने सल्ला देतो की त्यांनी काही झाले की चंद्रकांत दादा यांचे नाव घेणे बंद करावे. ज्या प्रभागातल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, त्या लोकांची कामे करण्याची ही वेळ आहे. विधानसभेला तुम्ही इच्छुक असाल तर विधानसभेला अजून वेळ आहे. २०२९ पूर्वीचे सहा महिने पुन्हा दादा-दादा चालू करा, पण सध्या तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिले आहे त्यांची कामे करा, असा मैत्रीत्वाचा सल्ला नगरसेवक पुनित जोशी यांनी दिला.

अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत दादा पाटील यांनी डीपी-डीसी मधून केलेल्या कामांसाठी खर्च झालेल्या निधीवर आक्षेप घेतला आहे. राज्यामध्ये मित्रपक्ष असताना देखील स्थायी समितीमध्ये कामाच्या चौकशीचे प्रस्ताव मांडले जात आहेत. प्रस्ताव मांडण्याला आक्षेप नाही, चंद्रकांत दादांच्या सर्व कामांची चौकशी केली तरी काही फरक पडणार नाही. चंद्रकांत दादा यांनी कोथरूड मतदार संघामध्ये महिला, वृद्ध यांच्यासाठी अनेक विकास कामे केली आहेत, असेही जोशी यांनी सांगितले.

चंद्रकांत दादा पाटील हे विकास कामांमध्ये कधीही दुजाभाव करत नाहीत. त्यांनी विरोधकांना देखील अनेकदा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अमोल बालवडकर यांनी परिसरातील विकास कामांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला नगरसेवक पुनीत जोशी यांनी दिला आहे.

See also  भाजपा उत्तर मंडळच्या उपाध्यक्षपदी प्रकाश मुकुंदराव तापकीर यांची नियुक्तीने तापकिरांची देखील प्रभाग 9 मध्ये इच्छुकांमध्ये एन्ट्री