शिवरायांच्या स्मारकाचा निधी शून्य केल्याचा आरोप; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा

पुणे : बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी मंजूर करण्यात आलेला १.५ कोटी रुपयांचा निधी शून्य करण्याच्या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाचा नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तीव्र शब्दांत निषेध करत भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या माध्यमातून बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप अपूर्ण असल्याची टीका करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देताना बालवडकर यांनी स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भाजपच्या माध्यमातून निधी रोखण्यात आल्यानेच स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचा आरोप केला.

“छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचा १.५ कोटी रुपयांचा निधी शून्य करण्याचा निर्णय निषेधार्ह आहे. छत्रपतींचा आशीर्वाद मागायचा आणि त्यांच्याच स्मारकाचा निधी शून्य करायचा, हा दुटप्पीपणा का?” असा सवाल बालवडकर यांनी उपस्थित केला.

या निर्णयाबाबत चंद्रकांतदादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी शिवप्रेमींची जाहीर माफी मागून निधी शून्य करण्यामागची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

स्मारकाचा निधी रोखल्याने काम रखडले असून, याची जबाबदारी संबंधित सत्ताधाऱ्यांनी स्वीकारावी, अशी भूमिका बालवडकर यांनी मांडली. निधीबाबत योग्य निर्णय घेऊन स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, स्मारकाच्या अपूर्ण कामावरून सुरू झालेल्या या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

See also  पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेरमध्ये पूनम विशाल विधाते व प्रमोद अण्णा निम्हण यांचे शक्तीप्रदर्शन