सुतारवाडीत विनापरवाना दारू विक्रीवर बाणेर पोलिसांची कारवाई; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : सुतारवाडी-पाषाण परिसरातील मुंबई-बेंगळुरू महामार्गालगतच्या सुर्वेज धाब्यावर विनापरवाना देशी, विदेशी दारू आणि बिअरची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाणेर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ६१ हजार २२० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.१८ वाजता सुर्वेज धाबा, मुंबई-बेंगळुरू महामार्ग सर्व्हिस रोडलगत, सुतारवाडी-पाषाण येथे ही कारवाई करण्यात आली. हॉटेलचे व्यवस्थापक गोपाळ श्रीकृष्ण निचळ, जागामालक अजय चोरमुले, मालक कुणाल सुधाकर गायकवाड तसेच त्यांचे भागीदार पवन येऊल, सचिन बोरोले, संदीप बोरुले आणि संकेत बोरुले हे संगनमताने विनापरवाना दारूची विक्री करताना आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

तसेच गणेश गावडे यांनी दारू विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५(ई), ६८, ८६ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५.०१ वाजता बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप करीत आहेत.

घटनास्थळी बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप आणि सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकान यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास बाणेर पोलीस करीत आहेत.

See also  कोथरूडमधील अनियमित पाणीपुरवठ्यावरुन चंद्रकांतदादा संतप्त राजकीय दबावाला बळी पडू नका! - पाणीपुरवठा अधिकारी आणि व्हॉलमनना सूचना