अल निनोचा प्रभाव महाराष्ट्रात पावसाची सरासरी ४४ टक्के तूट

विशेष प्रतिनिधी पुणे : अल निनोचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवला असून भारतीय वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिनाअखेरीस महाराष्ट्रात पावसाची सुमारे ४४ टक्के तूट आहे. साधारणतः १०ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहील. पण, मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, धरणं भरली, हे पश्चिम महाराष्ट्राचे सुदैव. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने ओढ दिली. अल निनोचा प्रभाव पुढील वर्षीच्या ऑगस्ट पर्यंत रहाणार आहे, हे लक्षात घेतले तर, पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा जपून वापरण्याच्या सूचना मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा खात्याला आणि महापालिकांना दिलेल्या आहेत.

पर्जन्यमानाचा आढावा घेता अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, जालना, चंद्रपूर, बीड या जिल्ह्यांमध्ये ऑगस्टमहिनाअखेर सरासरीच्या ७०टक्के देखील पाऊस झाला नाही, इतकी गंभीर स्थिती तिथे आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात परतीचा पाऊस विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात येईल एवढी एकच आशा आहे.

पावसाचा ऑगस्ट अखेरचा अंदाज पाहिला तर महाराष्ट्रात अनेक भागांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. शेतीच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होईल. या परिस्थितीपायी शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येईल का? याबाबत शंका आहे.

See also  भारती विद्यापीठात जिल्हास्तरीय पर्यावरण कार्यशाळा उत्साहात संपन्न