भारती विद्यापीठात जिल्हास्तरीय पर्यावरण कार्यशाळा उत्साहात संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन विषयक जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. युवकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच समाजहितासाठी जबाबदार नागरिक घडवणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी पाचारणे यांनी मार्गदर्शन करताना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात जागतिक तापमानवाढ, पाणी व वीज यांचा संतुलित वापर तसेच मानसिक प्रदूषण यांसारख्या गंभीर विषयांवर सखोल विवेचन केले.प्रमुख पाहुण्या कु. अनुशा सुजीत यांनी पूरानंतर उद्भवणाऱ्या समस्या तसेच पूरप्रतिरोधक शहरांच्या निर्मितीत अभियंत्यांची जबाबदारी यावर सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतूनच शाश्वत विकास साधता येईल, असे प्रतिपादन केले.

यावेळी उपप्राचार्या प्रा. डॉ. सुवर्णा चोरगे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. सविता इटकरकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सीमा हाडके उपस्थित होते. विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.

या कार्यशाळेअंतर्गत पर्यावरण विषयक पोस्टर निर्मिती स्पर्धा तसेच पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त जीवनशैली, जलसंधारण, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यावर आधारित प्रभावी सादरीकरणे केली. पथनाट्यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाची सामाजिक गरज ठळकपणे मांडण्यात आली.

या जिल्हास्तरीय कार्यशाळेत स्वराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, आप्पासाहेब जेधे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हुजूरपागा महिला कॉलेज, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, सरहद कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, एशियन कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, सिद्धिविनायक कॉलेज, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तसेच आयोजक महाविद्यालयातील मिळून ११४ हून अधिक राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झाले होते.

See also  ऍमेझॉन आणखी ९००० कामगारांना कामावरून कमी करणार.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक आणि कृतीशील दृष्टिकोन विकसित झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक तसेच सर्व विद्यार्थिनींचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.