देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा चतुर्वेद मंत्रजागराने शताब्दी वर्षास प्रारंभ

पुणे – चतुर्वेद मंत्रजागराने देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या शताब्दी वर्षास दिवाळी पाडव्याला प्रारंभ झाला.

ब्राह्मण ज्ञातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाला उत्तेजन देण्याकरिता स्थापन झालेली ही संस्था यंदा शताब्दी साजरी करीत आहे. दि. २९ ऑक्टोबर १९१४ रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर या संस्थेची स्थापना झाली. या निमित्ताने यंदा दिवाळी पाडव्याला एकनाथ मंगल कार्यालय येथे चतुर्वेद मंत्रजागराने शताब्दी वर्षाचा प्रारंभ करण्यात आला. राहुल चिंतामण जोशी यांच्या नेतृत्वाखाली ऋग्वेद, कृष्ण यजुर्वेद, साम वेद आणि अथर्ववेद यामधील मंत्रजागर करण्यात आले.

वेदमूर्ती माधव परांजपे, अथर्व पटवर्धन, मनिष पटवर्धन, सुशील पाटील, समीर मिराशी, सिद्धांत जोशी, मंदार क्षीरसागर यांनी ऋग्वेदाचा मंत्रजागर केला. विलास दिक्षित, मयुरेश डबीर यांनी कृष्ण यजुर्वेद, कृतार्थ असनीकर, रोहन बैरागी यांनी सामवेद आणि गणेश गोलेगावकर, रघुनाथ कुळकर्णी यांनी अथर्ववेद मंत्र सादर केले. खड्या आवाजातील मंत्रजागराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

मंत्रजागरातील सहभागी ब्रह्मवृदांचा यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, विश्वस्त चिटणीस सुनील पारखी आणि अन्य विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आला.

संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

See also  टोलवाल्यांचा झोल उघड,आम आदमी पार्टीची कारवाईची मागणी