पौड, ता. मुळशी : राज्य सरकारने प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याची घोषणा करून सहा महिने उलटले असतानाही शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी विद्यार्थ्यांच्या हातात दप्तर पडलेले नाही. शासनाने यासाठी तब्बल १६५ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप याबाबत कोणतेही ठोस आदेश निघाले नसल्याने विद्यार्थ्यांना दप्तराची प्रतीक्षा करावी लागत आहे. या प्रश्नाचा तातडीने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना दप्तर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
याबाबत राम गायकवाड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अमित कुडले, नामदेव टेमघरे, खंडू उभे आणि विजय मारणे यांच्या वतीने पौड येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना तातडीने मोफत दप्तर उपलब्ध करून देण्यासोबतच शाळांना गणवेशासाठीचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा यासाठी शिक्षकांनी स्वखर्चातून गणवेशाची व्यवस्था केली आहे. मात्र, संबंधित शिक्षकांची बिलेही अद्याप मिळालेली नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शाळांच्या स्वच्छतागृहांची पाहणी करण्याची मागणी
मुळशी तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील स्वच्छतागृहांची तातडीने पाहणी करून त्यांचा अहवाल तयार करावा. विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची नियमित तपासणी करण्यात यावी. आहारासाठी वापरण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
दप्तर वाटप, गणवेश निधी, शाळांमधील स्वच्छतागृहांची पाहणी आणि पोषण आहाराची तपासणी या सर्व बाबींवर प्रशासनाने एका महिन्याच्या आत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा युवासेनेच्या वतीने पंचायत समिती, पौड येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
















