ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे पुण्यात प्रथमच आयोजन
उद्योग-व्यवसाय विस्तार आणि परदेशी गुंतवणुकीच्या संधींविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे : उद्यमशील युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, बदलत्या काळानुरूप नवतंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायातील उपलब्ध संधींची, घडामोडींची माहिती व्हावी या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 (उद्योजक परिषद) पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती गर्जे मराठी ग्लोबलचे अध्यक्ष आनंद गानू, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाच्या महासंचालक शितल पांचाळ, नवउद्योजक सागर बाबर उपस्थित होते.
आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 (उद्योजक परिषद) दि. 10 आणि दि. 11 जानेवारी 2025 या कालावधीत द ऑर्किड हॉटेल, बालेवाडी पुणे येथे होणार आहे. या परिषदेत भारतासह, अमेरिका, युनाटेड किंग्डम, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया तसेच जगभरातील विविध देशांमधून उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार यांचा सहभाग असणार आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 500 व्यावसायिक, नवउद्योजक, कल्पक उद्योजक तसेच गर्जे ग्लोबल संस्थेमार्फत परदेशातील शंभराहून अधिक व्यावसायिक, उद्योजक व मान्यवर सहभागी होणार असून त्यांना उद्योग-व्यवसायातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसायांच्या संधी, बदलत्या संकल्पना, निर्मिती क्षेत्रातील उद्योजकता याविषयीही तज्ज्ञ अनुभव कथन करणार आहेत.


आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहित करत जागतिक पातळीवर व्यवसाय विस्तारासाठी नवनवीन संधींची उपलब्धता करून दिली जाणार असून महाराष्ट्राच्या व्यावसायिक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.महाराष्ट्रातील उद्योग व व्यवसायात गुंतवणुकीच्या संधींविषयी माहिती होण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योजक व परदेशातील गुंतवणूकदार यांना एका मंचावर संवादाची संधी मिळणार असून युवा उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना गुंतवणूदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिला उद्योजकांसाठी देखील व्यवसायाच्या संधी आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून व्यवसायवाढीसाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.


या परिषदेत देश-विदेशातून वक्ते, सरकारी आस्थापना, व्यावसायिक संघटना तसेच वाणिज्य दुतावासातील अधिकारी, व्यावसायिक धोरणकर्ते यांना आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स 2025चे संयोजक सचिन ईटकर असून नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक प्रतापराव पवार, व्हेरिस्मो नेटवर्क्सचे अध्यक्ष प्रकाश भालेराव (अमेरिका), पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, रवी बोरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉन्क्लेव्ह होत आहे. 
आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून त्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2024 आहे.

See also  गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन